धवलक्रांती चे जनक व बटरमॅन डॉ. वर्गीस कुरियन | Verghese Kurien Information in Marathi

Verghese Kurien Information in Marathi: दक्षिण भारतामधल्या दोन वैज्ञानिकांनी या देशामधले दोन अत्यंत महत्वाचे असे अन्नधान्य विषयक प्रश्न सोडवले आहेत. तमिळ वैज्ञानिक डॉ. एम्.एस्. स्वामीनाथन् यांनी ज्याप्रमाणं या देशात हरितक्रांती घडवून आणून या देशातल्या अन्नोत्पादनाचा प्रश्न सोडवला त्याचप्रमाणं केरळी वैज्ञानिक डॉ. वर्गीस कुरियन यांनी या देशात धवलक्रांती घडवून आणून दुग्धोत्पादनाची फार मोठी समस्या सोडवली. डॉ. वर्गीस कुरियन यांनी केलेलं काम हे ऐतिहासिक स्वरूपाचंच मानलं जातं. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळामधल्या आपल्या वैज्ञानिकांनी केलेली त्यांच्या त्यांच्या संशोधनक्षेत्रातली कामगिरी ही या देशा-मधल्या काही मूलभूत समस्या सोडविण्यासाठी फार महत्वाची ठरलेली आहे.

एक काळ असा होता की या देशात एक बाटलीभर दूध मिळवण्यसाठी दूध केंद्रावर रांगाच रांगा लागलेल्या दिसत असत. पण धवलक्रांतीच्या त्या यशस्वी प्रयोगानंतर आता दूध केंद्रावरची मंडळी माशा मारीत बसलेली दिसतात. दूध उत्पादन, वितरण, खरेदी-विक्री, या साऱ्या गोष्टींना सहकारी क्षेत्रात आणून वर्गीस कुरियन यांनी या क्षेत्रात खरोखरीच क्रांती घडवून आणली. त्याचा पाया त्यांनी गुजरातसारख्या राज्यात घातला हेही या ठिकाणी नमूद करायला हवं. डॉ. वर्गीस कुरियन म्हणजे ‘धवलक्रांतीचा युगप्रवर्तक’ अशीच त्यांची ओळख करून दिली जाते. डॉ. स्वामीनाथन् म्हटलं की हरितक्रांती हे जसं समीकरण आहे तसंच समीकरण ‘डॉ. वर्गीस कुरियन म्हणजे धवलक्रांती’ असं मांडलं जातं.

Verghese Kurien Information in Marathi
Verghese Kurien Information in Marathi

डॉ. वर्गीस कुरियन मराठी माहिती | Verghese Kurien Information in Marathi

भारत देशामधल्या वैज्ञानिकांनी स्वातंत्र्योत्तर काळात या देशातल्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यात आणि सामान्य माणसाचं भौतिक जीवन अधिकाधिक सुखी करण्यात खूप महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. कुणी अंतरिक्षविषयक संशोधनात रमला, तर कुणी दळणवळणाच्या सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामात व्यस्त झाला. कोणी अन्नधान्याची समस्या सोडविण्यासाठी संशोधनाची कास धरली तर कोणी पर्जन्यशास्त्राचा अभ्यास करून या देशातल्या पावसाच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र कष्ट करताना दिसला. कोणी विज्ञानाचा प्रसार करण्याच्या कामात गुंतला तर कोणी या देशातल्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कंबर कसून कामाला लागला. काहींनी तर विज्ञानकथांचं माध्यम वापरून समाजाला वैज्ञानिक दिशा देण्याचा प्रयल केला, तर काही शास्त्रज्ञ वैज्ञानिकांनी प्रत्यक्ष प्रयोग करून विज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला.

काही वैज्ञानिक मात्र त्यांच्या संशोधनाचा वापर करून सामान्य माणासाच्या दैनंदिन प्रश्नांचीच उकल कशी करता येईल, याकरता प्रयल करताना दिसतात. डॉ. एम्.एस्. स्वामीनाथन् काय, डॉ. वर्गीस कुरियन काय यांच्यासारखे ज्येष्ठ शास्त्रज्ञ वैज्ञानिक या देशामधल्या अन्नधान्योत्पादन, दुग्धव्यवसाय यात सुधारणा करून क्रांतिकारक बदल घडवून आणण्याच्या मागं लागले आणि मुख्य म्हणजे त्यात त्यांनी घवघवीत यश मिळवून दाखवलं. डॉ. वर्गीस कुरियन यांनी तर धवलक्रांतीच्या प्रयोगानं ग्रामीण क्षेत्रातलं सारं अर्थकारणच बदलून टाकायला मदत केली आणि गरीब शेतकऱ्याला दुग्ध- व्यवसाय हा एक उत्तम जोडधंदा मिळवून दिला. त्याला बारमाही रोजगार मिळेल अशी व्यवस्था त्यांच्या या धवलक्रांतीच्या संशोधनानं आणि यशस्वी प्रयोगानं सिद्ध झाली.

यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, पण डॉ. वर्गीस कुरियन यांच्या त्या अथक अशा श्रमामुळं 75-80 हजार खेड्यांमधल्या सुमारे 1 कोटी पेक्षाजास्त शेतकरी कुटुंबांमध्ये या दुग्ध व्यवसायामुळं चार पैसे खेळायला सुरुवात झाली. त्यामुळे या शेतकरी कुटुंबांचं राहणीमान सुधारायला केवढी तरी मदत झाली. यासाठी ते सर्व डॉ. वर्गीस कुरियन आणि त्यांचे शेकडों कार्यकर्ते यांना धन्यवाद देताना दिसतात. डॉ. कुरियन यांचं हे कार्य अगदी वेगळ्याच स्वरूपाचं म्हणायला हवं. त्यांनी लोकशाही मार्गानं आणि समजावणीच्या स्वरूपात शेतकऱ्यांना एकत्र गोळा करून जनसहभागाचं महत्त्व सर्वप्रथम पटवून दिलं. त्यांनी तंत्रमंत्र आणि व्यवस्थापन कौशल्याची सारी सूत्रं सहकारी सोसायट्यांकडे सुपूर्द केली.

त्या ग्रामीण क्षेत्रातल्या सहकारी संस्थांनी डॉ. कुरियन यांच्या सांगण्याचं मर्म नेमकं हेरलं. माणूस हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी विकासाचा पाया घालण्याचा निश्चय केला. त्यातून सहकारी संस्थांनी संपर्क साधला. त्यांनी दुग्ध विकासासाठी तर प्रयत्न केलेच पण त्याचबरोबर तेलबियांचं उत्पादनही सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचं आवाहन केलं. डॉ. कुरियन या माणसाच्या कर्तृत्वानं या देशात दुधाचा महापूर तर निर्माण झालाच, पण त्याचबरोबर या देशातल्या दरिद्रीनारायण म्हणवणाऱ्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थितीही सुधारली. त्यातून दूधदुभतं आणि तेलबियांच्या उत्पादनासंदर्भात हा देश स्वयंपूर्ण होण्यासाठी खूप मदत झाली. डॉ. कुरियन यांच्या प्रयत्नामुळं खरेदी-विक्री प्रक्रियेमधला दलाल-एजंट-मिडलमॅन पूर्णपणानं नाहीसा झाला, हेही सर्वांत महत्वाचं.

यापूर्वी भाजीपाला, फळफळावळ, दूधदुभतं, तेलबिया यांच्या व्यापारात एजंट हा असायचाच. तो दलालच श्रीमंत व्हायचा. भाव पाडून मागायचा. भरमसाठ भावानं नंतर तो विक्री करायचा. हे सारं थांबलं ते डॉ. वर्गीस कुरियन यांच्या प्रयत्नानं. मीठ-उत्पादकांच्या बाबतीतही अनेक प्रकारचे अन्याय व्हायचे. तेही डॉ. कुरियन यांनी स्वतः लक्ष घालून थांबवले. त्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून तर प्रयत्न केलेच, पण शेतकऱ्याला प्रतिष्ठेनं जगता यावं यासाठी खास प्रयत्न केले आणि हे सारं करताना त्यांनी स्वतःचा बडेजाव किंवा तोरा मिरवला नाही. त्यांनी दुधाच्या डेअऱ्या तर काढल्याच, पण त्यांच्या व्यवस्थापनासाठी सेवक वर्गाला प्रशिक्षण देऊन तयार केलं.

Verghese Kurien Information in Marathi

1979 मध्ये डॉ. कुरियन यांनी गुजरातमधल्या आणंद या ठिकाणी ग्रामीण व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणारी एक दर्जेदार अशी ‘ग्रामीण व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण संस्था’ स्थापन केली. सुरुवातीला ग्रामीण क्षेत्रातल्या सहकारी तत्त्वावरच्या दुग्ध व्यवसायाचं व्यवस्थापन शिकवण्यासाठी ही संस्था सुरू करण्यात आली होती. या विषयासंदर्भात संशोधनही याच संस्थेमार्फत व्हावं अशी कल्पना होती. डॉ. कुरियन यांची दूरदृष्टी या मागं होती आणि ती फार प्रकर्षानं दिसते. आज ना उद्या या देशात दुधाचा महापूर निर्माण होईल, हे त्यांना फार पूर्वीच कळून चुकलं होतं. दूध व्यवसायाबरोबरच त्यांनी भाजीपाला, फळफळावळ, तेलबिया, जंगलांचं व्यवस्थापन असेही अनेक उद्योग शेतकऱ्यांसाठी जोडधंद्याच्या दृष्टीनं विकसित केले. या सगळ्या कार्याच्या जोडीलाच डॉ. कुरियन यांनी ‘त्रिभुवनदास प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापनाही केली.

त्रिभुवनदास प्रतिष्ठान या प्रतिष्ठानमार्फत शेतकऱ्याला आरोग्य सेवा देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याबद्दलच्या विविध योजनांचा अभ्यास त्यांनी याच प्रतिष्ठानमार्फत सुरू केला. ज्याप्रमाणं मुंबई- मधला माणूस त्याच्या छोट्या वा मोठ्या जागेचा विचार करून मगच फर्निचर बनवण्याची ऑर्डर देत असतो, त्याचप्रमाणं खेड्या-खेड्यांची निरनिराळी गरज लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार त्यांचे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे विकास आराखडे वा प्रकल्प आखावेत, व खेड्याची गरज ही व खेड्याच्या गरजेपेक्षा वेगळी असणार, हे लक्षात आणून देऊन त्यांनी त्यानुसार साऱ्या योजना तयार करण्याची कल्पना ग्रामस्थांना पटवून दिली. त्यानुसार ग्रामीण क्षेत्रातल्या खेड्यांनी, गावांनी, वाड्यावस्त्यांनी त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणं सांडपाण्याच्या, पिण्याच्या पाण्याच्या, आहाराच्या, कुटुंब कल्याणाच्या, आरोग्याच्या योजना तयार करून आपल्या प्रगतीचा मार्ग ठरवून घेतला.

मुळात ‘दूध’ हे केंद्रस्थानी ठेवून डॉ. कुरियन या वैज्ञानिक-शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञानं हळूहळू ग्रामीण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या अनेक योजना राबवल्या. डॉ. कुरियन यांनी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून महत्वाची कामगिरी केली. दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई अशा महानगरांना दूधपुरवठा सुरू करून शेतकरी आणि दूध उत्पादकांना सहकाराच्या चळवळीतून चार पैसे मिळवून देण्याची आणि शहरी ग्राहकाला कसदार दूध मिळण्याची जबाबदारी त्यांच्या मंडळानं घेतली. यामुळं डॉ. कुरियन यांचं आणि त्यांच्या मंडळाचं नाव थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं.

सुरुवातीच्या काळात हा प्रयोग महानगरात करून पाहण्यात आला हे खरं. पण हळूहळू सहकारी तत्वावर दूध उत्पादन करण्याचे प्रयोग हे साऱ्या भारतभर सुरू झाले. 1985 च्या आसपास या देशात दुधाचा महापूर आला. शेतकऱ्याला उत्तम जोडधंदा मिळाला. त्याला वरखर्चासाठी चार पैसेही मिळायला लागले. सुमारे 50 हजार दूध उत्पादन सहकारी संघ देशात ठिकठिकाणी निर्माण झाले. जागतिक स्तरावर या साऱ्या कामाची नोंद घेण्यात आली. 50-60 लाख दूध -उत्पादकांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध झाला. साखरसम्राटांप्रमाणंच आता तर दूधसम्राटही निर्माण होताना दिसतात.

मुळात डॉ. वर्गीस कुरियन हे केरळी असले तरी ते त्यांचे जमशेदपूरमध्ये राहणारे काका यांच्या घरी राहात होते. 26 नोव्हेंबर 1921 रोजी त्यांचा जन्म झाला. सारं काही सुखेनैव चालू होतं. पण परदेशात जाऊन डॉ. कुरियन यांनी डेअरी इंजिनियरिंगमधली पदवी प्राप्त केली. त्यातून त्यांनी समाजाच्या, खास करून शेतकरी समाजाच्या कल्याणासाठी कशा पद्धतीनं काम उभं केलं आणि ते या देशामधल्या शेतकऱ्यांना शेवटी कसं उपयोगी ठरलं हे पाहणं मला खूप महत्वाचं वाटतं. 1949 च्या सुमाराला ते गुजरातमधल्या आणंद या ठिकाणी आले आणि एका गॅरेजमध्ये राहणारा हा मुळामधला डेअरी इंजिनियर. पण या देशात क्रांतिकारक ठरणारं असं त्यानं काही करून दाखवलं.

‘धारा’, ‘लोकधारा’, ‘अमूल उत्पादनं’ हे सारं ज्यानं निर्माण केलं, वाढवलं आणि शेतकऱ्यांचं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला ते 85-86 वर्षांकडं झुकणारे डॉ. कुरियन हे वैज्ञानिक नाहीत तर कोण आहेत ? खरं तर ते तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संघटक आणि शेतकऱ्यांचे तारणहारही आहेत. ‘बटरमॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. कुरियन यांनी दुग्ध व्यवसायाचं तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी पीएच.डी. मिळवली. त्या विषयामधल्या तंत्रमंत्राचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. ते आता म्हणतात की, ‘मी केवळ निरनिराळी पारितोषिकं, मानसन्मान, किताब मिळण्यासाठीच उरलो आहे. माझे सहकारी खरं काम करतात आणि मी मात्र मानसन्मान, पारितोषिकं, किताब घेण्याचं तेवढं काम करतो.’ ते खरं नाही. प्रसंगी अमेरिकेला फटकावणारे डॉ. वर्गीस कुरियन यांनी या देशामधल्या सहकाराची शक्ती ओळखलेली आहे.

‘मंथन’ या चित्रपटानं दोन गोष्टी झाल्या. एक स्मिता पाटील या अभिनेत्रीला खूप नाव मिळालं. पण त्यापेक्षा अधिक महत्वाचं काम झाल ते म्हणजे गुजरातमधल्या ‘आणंद’ या ठिकाणच्या डॉ. वर्गीस कुरियन निर्मित सहकारी दूध योजनेची शक्ती साऱ्या देशाला कळायला मदत झाली. डॉ. वर्गीस कुरियन यांना वाटतं की अमूल, आनंद, धारा, लोकधारा असे किती तरी प्रकल्प या देशात अजून उभे करायचे आहेत. त्यासाठी लोकशाही पद्धती आणि श्रम यांवर आपली जाज्वल्य निष्ठा हवी. मला वाटतं की डॉ. वर्गीस कुरियन हे केवळ वैज्ञानिक नाहीत, तर या देशामधल्या 70 टक्के गरीब जनतेला- शेतकऱ्याला दिलासा देणारे ते शेतकरी कुटुंबाचे खरे डॉक्टर आणि मित्रही आहेत.

Verghese Kurien Information in Marathi

अनेकदा असं वाटतं, की डॉ. वर्गीस कुरियन वा डॉ. एम्.एस्. स्वामीनाथन् यांच्यासारख्या वैज्ञानिक शास्त्रज्ञ तंत्रज्ञांनी या देशात धवलक्रांती किंवा हरितक्रांती घडवून आणली नसती, तर… तर 1947 मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या वेळी केवळ 35 कोटी लोकसंख्या असणारा हा देश, आज आपल्या एक अब्जांपेक्षाही जास्त असणाऱ्या लोकसंख्येचं पालनपोषण कसं करू शकला असता? त्यामुळं मानवाच्या सुखी-समृध्द जीवनासाठी प्रयत्न करणारे हे शास्त्रज्ञ-वैज्ञानिक खरं तर जिते जागते परमेश्वरच मानायला हवेत. त्यांना ‘Living God’ असंच संबोधणं अधिक योग्य होईल.

काही काळापूर्वी हातपाय झडून जाणारं औषध तयार करणाऱ्या एका परदेशी संशोधकाची कथा वाचीत होतो. ते औषध बाजारात आलं नाही. पण या प्रकारची विकृती असणारे काही संशोधक हे राक्षसी प्रवृत्तीचे मानायला हवेत. पण सुदैवानं भारतीय संशोधक-वैज्ञानिक शास्त्रज्ञ -तंत्रज्ञ यांच्या खूप मोठ्या मंदिरातल्या डॉ. वर्गीस कुरियन, डॉ. एम्.एस्. स्वामीरनाथन् अशासारख्या, विधायक विचार करूनच संशोधनाची कास धरणाऱ्या वैज्ञानिकांच्या कार्याला म्हणूनच मनापासून कुर्निसात करून त्यांच्या कार्यापुढं नतमस्तक व्हावंसं वाटतं.


हे पण वाचा

भारतीय अनुभौतिक शास्त्रज्ञ


Aakriti Deshmukh

नमस्कार मित्रांनो, मी आकृति देशमुख, मी B.SC IT केली असून पुण्यामधील एका प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करते. लहानपणासूनचच मला वाचनाची आवड होती आणि कॉलेज ला गेल्यापासून मला लिहायची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मी marathideliynews.com या वेबसाइट ची सुरुवात केली आहे, मी मला माहिती असलेल्या टॉपिक वर सखोल माहिती घेऊन माझ्या या ब्लॉग वर लेख लिहिते.

Leave a Comment