jagdish chandra bose information in marathi: वनस्पतींमध्येही मानवाप्रमाणंच आनंदाची, भयाची, रागाची, लोभाची भावना असते, अशा त-हेचा अत्यंत महत्त्वाचा आणि साऱ्या जगाला स्तिमित करणारा शोध लावणाऱ्या संशोधकाचं नाव आहे. सर जगदीशचंद्र भगवानचंद्र बोस. जगदीशचंद्रांचा जन्म 30 नोव्हेंबर 18158 रोजी सध्या बांगलादेशमध्ये असणाऱ्या विक्रमपूर या शहरात झाला. त्यांचे वडील हे ब्रिटिश सरकारच्या नोकरीत न्याय खात्यात होते. ते डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. म्हणजे अर्थातच त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही बऱ्यापैकी असणार. त्यामुळं बालपण हे सुखात, चैनीत गेलेलं असणार. त्यांना पाच बहिणी होत्या. पण हे त्या काळातल्या एकंदर परिस्थितीनुसारच होतं.
स्वातंत्र्यपूर्व काळातली ही सारी वैज्ञानिक मंडळी. त्या वेळची भारत देशाची एकंदर हलाखीची परिस्थिती, अडाणीपण, अज्ञान, निरक्षरता, बेरोजगारी इत्यादी गोष्टींवर मात करायची तर उद्योग-धंद्याचं शिक्षण तरुणांना मिळायला हवं असं यांपैकी अनेक वैज्ञानिकांनाही वाटायचं. सर बोस हे अशा वैज्ञानिकांपैकीच एक होते. केवळ ब्रिटिशांचं अंधानुकरण करून आपल्याला प्रगती साधता यायची नाही हेही हे वैज्ञानिक जाणून होते. या वैज्ञानिकांच्या पैकी ज्यांच्या घरी शिक्षणाचा चांगला संस्कार होता, त्यांना या गोष्टीचं बाळकडू त्यांच्या घरी लहानपणीच मिळालेलं होतं. या गोष्टीचं त्यांना भान होतं. सर जगदीशचंद्र बोस हे तर बऱ्यापैकी सधन, घरच्या घरीच बाग, तलाव. त्याचबरोबर त्यांनी मासे, बिनविषारी साप, ससे असे काही जलचर प्राणीही पाळलेले होते. या वैज्ञानिकाला बालपणापासूनच निसर्गाची, वृक्षवेलींची विलक्षण आवड होती. यातूनच त्यांच्या संशोधन कार्याचा जन्म झाला.
सर जगदीश चंद्र बोस | jagdish chandra bose information in marathi
वनस्पतींना भावभावना असतात, त्या संवेदनक्षम असतात्. मनुष्यप्राण्याप्रमाणं वनस्पतीही श्वासोच्छ्वास करतात, झोपतात, लाजतात, इतर प्राणिमात्रांप्रमाणं त्यांचीही वाढ होते याचा अर्थ त्यात जीव असतो अशा तहेचं प्रतिपादन सर्वप्रथम केलं गेलं ते सर जगदीशचंद्र भगवानचंद्र बोस या वनस्पतीशास्त्रज्ञाकडून. त्या संशोधनाला मदत व्हावी म्हणून त्यांनी क्रेस्कोग्राफ या नावाच्या यंत्राचा वापरही केला. 1906 मध्ये सर जगदीशचंद्र बोस या वैज्ञानिकानं ‘वनस्पतींच्या संवेदना’ या नावाचं पुस्तक लिहून ते प्रसिद्ध केलं. वनस्पतींच्या संवेदनांची नोंद करणारं ‘रिसोनंट रेकॉर्डर’ या नावाचं एक यंत्र सर बोस यांनी तयार करून वनस्पतींच्या संवेदनांची भावभावनांची नोंद करण्याचं काम सुकर केलं. ज्या गोष्टींची सामान्य माणसाला कसलीही कल्पना येऊ शकणार नाही अशा त-हेचा हा एक वेगळ्याच प्रकारचा संशोधन विषय होता.
सामान्य माणसाला साधारणपणे एकच गोष्ट ठाऊक असते ती लाजाळूच्या झाडाची. लाजाळूचं झाड हात लावताच जसं झटकन् लाजल्यासारखं अंग आक्रसून घेतं तसंच इतरही काही वनस्पतींवर काही रासायनिक प्रक्रिया केली तर त्याही काही विशिष्ट संवेदना प्रकट करतात हे सर जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनाचं सार होतं. रॉयल सोसायटी या वैज्ञानिक संस्थेचे त्या काळातले अध्यक्ष सर जॉन अँडरसन यांनी सर बोस यांचा वनस्पतीविषयक संशोधनाचा हा प्रयोग पाहण्यापूर्वी ‘खुळचटपणा’ अशी त्याची संभावना केली होती. पण मग निरनिराळ्या वैज्ञानिकांनी प्रयोग पाहून सर जगदीशचंद्र बोस यांचं मनापासून अभिनंदन केलं. सोसायटीचं सभासदत्व त्यांना बहाल करण्यात आलं.
बोस यांच्यासारखे वैज्ञानिक पारतंत्र्यात अशी कामगिरी करून दाखवीत होते आणि ‘सर’ हा किताब मिळवीत होते. जगदीशचंद्र बोस यांच्या वनस्पतीशास्त्र विषयक त्या अभूतपूर्व अशा संशोधनाला आंतरराष्ट्रीय कीर्ति आणि मान्यताही प्राप्त झाली होती हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करायला हवं. म्हणूनच देश गुलामगिरीत खितपत पडलेला असताना सर जगदीशचंद्र बोस यांच्यासारख्या वैज्ञानिकांनी केलेलं संशोधन हे अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण त्यामुळं ब्रिटिशांच्या जोखडाखाली वावरणाऱ्या देशातही हुशार शास्त्रज्ञ आहेत हे जगाला समजत होतं.
जगदीशचंद्र यांचं प्राथमिक शिक्षण हे बंगाली या त्यांच्या मातृभाषेतच झालं होतं हेही आजच्या इंग्रजी माध्यमाचा उगाचच अट्टाहास करणाऱ्या पालकांनी लक्षात घ्यायला हवं. फरीदपूरसारख्या छोट्याशा गावात ते शिकले. नंतर सेंट झेवियर्स या शाळेत शिकले. वसतीगृहात त्यांचं वास्तव्य होतं. परिणामी विविध जातीधर्माच्या मुलांशी त्यांचा संबंध आला. दृष्टी विशाल झाली. सोळाव्या वर्षीच बोस मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना निसर्गाची एवढी आवड होती, की त्यांनी वसतीगृहातच बाग-बगीचा तयार केला होता. कलकत्ता विद्यापीठातून ते पदवीधर झाले. काही अडचणींमुळे इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेता येणार नाही असं त्यांना वाटलं.
त्यावेळी त्यांच्या मातेचे काही दागिने विकून ते इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी रवाना झाले. मुळात डॉक्टरीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर जगदीशचंद्रांना मृतं शरीराच्या चिरफाडीचा वास आणि प्रयोगशाळेमधले विविध प्रकारचे उग्र वास सहन होईनात. त्यांनी त्यांचा अभ्यासक्रमच बदलला. केंब्रिज विद्यापीठामधल्या ख्रिस्त कॉलेजात प्रवेश घेऊन त्यांनी विशुद्ध विज्ञान या विषयाचा अभ्यास सुरू केला. वयाच्या 26 व्या वर्षी सर जगदीशचंद्र हे बी.ए. आणि बी.एस्सी. या दोन्ही पदव्या प्राप्त करणारे केंब्रिज विद्यापीठातले एक हुशार विद्यार्थी म्हणून प्रो. रेले यांच्यासकट सर्वांना ज्ञात झाले.
या वैज्ञानिक – शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञांनी स्वतःचा मानसन्मान कायम रहावा या दृष्टीनं सुद्धा पारतंत्र्याच्या काळात काही गोष्टी आवर्जून केलेल्या दिसतात. प्रेसिडेन्सी या कलकत्त्यामधल्या कॉलेजात शिकवत असताना भारतीय आणि ब्रिटिश अशा दोन शास्त्रज्ञांच्या पगारामध्ये फरक असायचा. त्यात भारतीय शास्त्रज्ञांना पगार कमी असायचा. बाकीच्या सवलतींमध्येही बरीच तफावत असे. याच्या विरोधात त्यांनी सत्याग्रह केला आणि सुमारे तीन वर्षांपर्यंत पगारही घेतला नाही. अर्थात त्यांच्या त्या सत्याग्रहामुळं त्यांना अधिक मानसन्मान मिळू लागला. त्यांना एकदम तीन वर्षांचा पगारही देण्यात आला.
दुर्गामोहन दास या बंगाली पुढाऱ्याची कन्या अबला हिच्याशी नंतर त्यांनी विवाह केला. पदार्थविज्ञान या विषयावर अनेक निबंध लिहिणारे सर जगदीशचंद्र बोस यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळाही स्थापन केली होती. त्यांचा विद्युत् चुंबकीय तरंगाच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग त्यांनी गव्हर्नरच्या उपस्थितीत करून सर्वांची वाहव्वा मिळवली होती. त्यानंतर 1895 मध्ये त्यांना लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. विज्ञानाच्या क्षेत्रात पाश्चिमात्य देश पुढं आहेत हे त्या काळातलं विधान त्यांनी अनेक बाबतीत खोटं ठरवलं. रॉयल सोसायटीनं त्यांना त्यांच्या संशोधन कार्य आणि लेखांच्या प्रसिद्धीसाठीआर्थिक साहाय्य देऊ केलं. पण त्यांच्या कॉलेजमधल्या मंडळींनीच त्यात अनेक खोडे घातले.
डॉ. बोस यांनी प्राणी आणि वनस्पती यांच्यात असणाऱ्या अनेक साधर्त्यांची प्रचिती देण्याचा सतत प्रयत्न केला. त्याचबरोबर सजीव व निर्जीव यामधला समान धागा शोधण्याचाही प्रयत्न करून बघितला. प्राणी, वनस्पती आणि धातू यात काय समान आहे याविषयीही त्यांचं संशोधन चालूच असे. आनंदाचा भाग म्हणजे सर जगदीशचंद्र बोस यांचं मुंबई विद्यापीठात ‘जीवमात्रांचे ऐक्य’ या विषयावर 1918 साली खास व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यांच्या संस्थेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते देणगी देण्यात आली होती. त्यापूर्वी 1915 साली त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजातून निवृत्त होऊन स्वतःची संशोधन संस्था सुरू केली होती.
1920 साली सर जगदीशचंद्र बोस हे युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी इंग्रजी नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी त्यांना त्यांचे दहा वाङमयीन ग्रंथ भेट दिले होते, अशीही नोंद सापडते. ही अशा प्रकारची माणसं भरभक्कम काम करतात. त्यामुळं ती ज्या वेळी आपल्यातून जातात त्या वेळी ती त्यांच्या कामाच्या स्वरूपात कायम मागं राहतात. सर जगदीशचंद्र बोस हे याच स्वरूपात मागं राहिले होते, नव्हे आजही मागं राहिलेले आहेत. रेडिओ लहरींबद्दलचा त्यांचा शोध खूपच महत्वाचा ठरला. त्यांनी कधी पेटंटची विक्री केली नाही. याउलट माझं ज्ञान हे सर्वांसाठी खुलं आहे अशी भूमिका घेतली. प्रकाश लहरींबाबतचं त्यांचं संशोधन हेही तितकंच महत्वाचं ठरत होतं.
सजीव वा निर्जीव पदार्थांवर विषारी पदार्थांचा सारखाच परिणाम होत असतो असाही शोध त्यांनी लावला. 1902 मध्ये पॅरिसमध्ये जी वैज्ञानिक परिषद भरली होती त्यातल्या भारतीय पथकाचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. भारताची मान आणि शान उंचावून भारतीय विज्ञान संशोधनाची पताका अटकेपार फडकवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये सर जगदीशचंद्र बोस या शास्त्रज्ञाचा फार मोठा वाटा होता हे इतक्या वर्षानंतरही खरं आहे. 1917 मध्ये वयाच्या 59 व्या वर्षी त्यांना ब्रिटिश सरकारचा ‘सर’ हा बहुमान प्राप्त झाला.
वैज्ञानिक क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करून दाखवणाऱ्या या वैज्ञानिकाला 17 नोव्हेंबर1937 साली मृत्यू आला. देश स्वतंत्र झाल्याचं पाहणं दुर्दैवानं त्यांना शक्य झालं नाही. पण देशभक्ती, देशप्रेम, विज्ञाननिष्ठा, अथक परिश्रम, भरपूर काम करण्याची वृत्ती, निष्ठा या साऱ्या गुणांमुळं विज्ञानाच्या क्षेत्रात एक ‘रोल मॉडेल’ म्हणूनच सर जगदीशचंद्र बोस या वनस्पतीशास्रज्ञ वैज्ञानिकाकडे बघितलं जातं.ते आज आपल्यात नसले तरी त्यांची स्मृती त्यांच्या बोस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या स्वरूपात मागं उभी आहे आणि अनेक तरुण वैज्ञानिकांनी या इन्स्टिट्यूटचा आपल्या संशोधनकार्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे. आणखी काय हवं !
संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षांपूर्वी आपल्या एका अभंगात लिहून ठेवलंय, की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे; हे विधान संत तुकाराम महाराजांनी कदाचित् भावनांवर आधारित केलं असावं असं म्हणता म्हणता सर जगदीशचंद्र बोस या नावाच्या एका विख्यात वैज्ञानिक शास्त्रज्ञानं, तुकाराम महाराजांचं तेच विधान वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून वनस्पतींनाही भावभावना असतात हे दाखवलं वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस काय कुठून शिकले हे सारं विज्ञान तत्वज्ञान ? अहो एकोणीसाव्या शतकाचा विचार केला, तर 1864 मध्ये 1857 च्या बंडाचं वातावरण असणार.
त्या काळी वनस्पतीशास्त्रविषयक संशोधन करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या सोयी उपलब्ध होत्या कुणास ठाऊक. पण ही सारी वैज्ञानिक मंडळी एखाद्या व्रतस्थ महापुरुषाप्रमाणं स्वतःच्या संशोधनकार्यात मग्न झालेली दिसतात. त्यात देश पारतंत्र्यात. आपण जे काही काम करतो आहोत त्याबद्दल परकीय सत्ताधीश शाबासकी देणं तर सोडाच, उलट आपल्यालाच छळत राहतील की काय असा विचार मनात यावा या स्वरूपाचं एकूण वातावरण.
पण ज्याप्रमाणं एखादा योगी अध्यात्माचं माध्यम वापरून ‘जनकल्याण’ हेच आपलं अंतिम साध्य ध्येय आहे ही भूमिका घेऊन अनुष्ठानाला बसतो त्याच पध्दतीनं आपल्या संशोधनकार्याची मांड क्षणभरही सैल होऊ न देता हे सारे भारतीय वैज्ञानिक कार्यप्रवण झालेले दिसतात. अति महत्वाच्या अशा या मान्यवर वैज्ञानिकांचा एक नेता आहे तो सर जगदीशचंद्र बोस किंवा बसु. एखादा देश मोठा होतो तो केवळ त्या देशातल्या मोठमोठ्या इमारतींमुळं किंवा केवळ कारखानदारीचा विकास झाला म्हणून नव्हे, तर त्या देशातली माणसंही आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवण्याचं सामर्थ्य असणारी असावी लागतात, निपजावी लागतात. म्हणूनच अशा या मान्यवर शास्त्रज्ञ वैज्ञानिकांचं स्मरण करायला हवं ते त्यांच्या जीवनकार्यापासून स्फूर्ती घेऊन आपला देश अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी.
असेच वेगवेळ्या वैज्ञानिकान बद्दल माहिती वाचा