डॉ. विक्रम साराभाई मराठी माहिती | Vikram sarabhai information in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Vikram sarabhai information in marathi : क्षेत्र कुठलंही असो. त्या क्षेत्राचा पाया घालणारी मंडळी ही त्या त्या क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आज उपग्रहाच्या, अंतरिक्ष संशोधन क्षेत्राच्या जगात जे काही विलक्षण काम उभं आहे त्या कामाचा पाया घालणारा एक वैज्ञानिक-शास्त्रज्ञ म्हणून डॉ. होमी भाभा यांच्यानंतरच्या लगेचच्या काळात आवर्जून स्मरणात राहतात ते डॉ. विक्रम साराभाई. अत्यंत देखणा, हसतमुख, हुशार आणि अल्पवयातच आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झालेल्या या वैज्ञानिकाला त्या मानानं तरुण वयात आणि हृदयक्रिया बंद पडून अचानक मृत्यू आला हे या देशाचं फार मोठं दुर्दैव मानायला हवं. पण तसं घडलं हे नाकारूनही चालणार नाही. डॉ. विक्रम साराभाई केवळ नावच पुरं आहे असं या माणसाचं त्याच्या कार्यक्षेत्रामधलं काम आहे.

डॉ. साराभाई यांना जर दीर्घायुष्य लाभलं असतं तर या देशानं अंतरिक्ष संशोधन क्षेत्रात किती प्रचंड कामगिरी करून दाखविली असती याची कल्पनासुद्धा येणार नाही एवढी या वैज्ञानिकाच्या कामाची प्रचंड झेप होती. पण दुर्दैवानं आपलं काय, की खुद्द वैज्ञानिकांचं काय, ‘त्या’ महान् शक्तीच्या इच्छेपुढं काही चालू शकत नाही हे शेवटी खरं आहे. डॉ. विक्रम साराभाई यांच्या अकाली निधनानं, तो मृत्यू कदाचित घातपाताचा प्रकार असावा असं अजूनही इतक्या वर्षांनंतरही बोललं जातं.

Vikram sarabhai information in marathi
Vikram sarabhai information in marathi

डॉ. विक्रम साराभाई | Vikram sarabhai information in marathi


भारताचं अंतरिक्ष संशोधन काही वर्षांनी तरी मागंच राहिलं याचं एक प्रमुख कारण डॉ. विक्रम साराभाई या वैज्ञानिकाच्या अत्यंत प्रगल्भ अशा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दुस्वास करण्याच्या, हेवा करण्याच्या काही जणांच्या प्रवृत्तीबाबत असणाऱ्या जनसामान्यांच्या प्रचंड रागात दडलेलं असावं. डॉ. साराभाई यांच्यावर जनसामान्यांसकट मान्यवर वैज्ञानिक शास्त्रज्ञांचा प्रचंड जीव होता. त्यामुळं शत्रू पक्षाकडून घातपात करून त्यात त्यांच्यावर घाला घातला गेला असावा असं अजूनही अनेक जण आपलं मत व्यक्त करताना दिसतात. कारण भाभा आणि डॉ. साराभाई यांच्या मृत्यूमध्ये काळाच्या दृष्टीनं विचार केला तर केवळ ५-७ वर्षांचं अंतर होतं.

डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. ते गुजरातची राजधानी अहमदाबाद इथं जन्माला आले. डॉ. विक्रम साराभाई हे मुळात पारशी. बऱ्यापैकी सधन कुटुंबांपैकी एक असं हे साराभाई कुटुंब. त्यांच्या पत्नी मृणालिनी साराभाई. मृणालिनी साराभाई या जगद्विख्यात नर्तिका आहेत. त्यांना दोन अपत्यं. पैकी त्यांची कन्याही नृत्य विशारद आहे. डॉ. विक्रम साराभाई यांना प्रथमपासूनच यंत्रविद्या म्हणजेच इंजिनियरिंग या विषयामध्ये खूप रस होता. ‘शेवटी बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात’ ही म्हण अखेर खरी आहे. अनेक मोठ्या माणसांच्या जीवनकार्यावर नजर टाकली, तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवल्याखेरीज राहात नाही, की या मोठं होणाऱ्या मंडळींच्या लहानपणीच त्यांना कुठल्या क्षेत्रात नेमकी आवड आहे हे स्पष्ट झालेलं दिसतं. किंबहुना त्याची चुणूक तरी लहानपणीच दिसलेली असते.

हा अनुभव जवळपास साऱ्याच क्षेत्रामध्ये नंतर मोठी कीर्ति मिळवणाऱ्या मंडळींच्या बाबतीत अनुभवाला येताना दिसतो. डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावापुढं काय लिहायचं असा प्रश्न पडलाच, तर ‘भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ’ एवढंच बिरूद पुरेसं आहे. किंबहुना ‘भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ’ एवढ्याच विरूदानंसुद्धा डॉ. विक्रम साराभाई यांचा परिचय पूर्ण होऊ शकतो. हे मात्र खरं, की डॉ. साराभाई यांनी या क्षेत्राचा पाया घातलेला असला तरी नंतरच्या अंतराळ संशोधकांनी या क्षेत्रात क्रांतिकारक स्वरूपाची कामगिरी करून दाखवलेली आहे. तरीही त्यामुळं अर्थातच विक्रम साराभाईंच्या त्या अलौकिक अशा पायाभरणीच्या कामाचं महत्त्व तसूभरसुद्धा कमी होत नाही.

Vikram sarabhai information in marathi

डॉ. विक्रम साराभाई यांना अगदी लहानपणापासूनच गणित हा विषय आवडत असे. त्या काळात म्हणजे पारतंत्र्याच्या काळात डॉ. विक्रम साराभाई हे इंग्लंडच्या राजधानीत लंडनमध्ये सेंट जॉन कॉलेजात शिकत असत हेही या ठिकाणी मुद्दाम नमूद करण्यासारखं आहे. आपलं शिक्षण पूर्ण करून डॉ. विक्रम साराभाई भारतात परतले आणि त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या सर सी. व्ही. रामन यांच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या बंगळूरमधल्या संस्थेत काम करायला सुरुवात केली. अशा अनेक शास्त्रज्ञांच्या कामाचं स्वरूप पाहताना एक गोष्ट जाणवते, की या मंडळींनी जीवतोड मेहनत करून विज्ञानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून दाखवली आहे. म्हणूनच हा देश प्रगतीची काही क्षेत्रं पादाक्रांत करू शकला. ‘कॉस्मिक रे पार्टिकल्स’ या विषयाच्या क्षेत्रात डॉ. विक्रम साराभाई यांनी खास संशोधन केलं.

पंडित नेहरू यांच्या ऐन बहारीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांना होमी भाभा, विक्रम साराभाई यांच्या सारखे अनेक मान्यवर तंत्रज्ञ शास्त्रज्ञ- वैज्ञानिक लाभले हेही या देशाचं भाग्यच मानायला हवं. ‘विश्व किरणांची व्युत्पत्ती’ हाही त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यानंतर जसजसा आत्मविश्वास वाढत गेला तसतसा या माणसानं स्वतःची स्वतंत्र अशी ‘फिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’ निर्माण करण्याचा संकल्प सोडून तो पुरा करून दाखविला. याच संस्थेत प्राथमिक स्वरूपात अंतरिक्ष संशोधन कार्याला प्रारंभ झाला. विज्ञान हे केवळ शहरातच राहून चालणार नाही तर ते खेड्यापाड्यातही पोहोचायला हवं यासाठी त्यांनी ‘कम्युनिटी सायन्स सेंटर’ नावाची संस्था स्थापन केली.

डॉ. विक्रम साराभाई हे केवळ वैज्ञानिक वा शास्त्राचे अभ्यासकच नव्हते तर त्यांना व्यापार-उद्योगधंदे उद्योगधंद्यांमधलं संशोधन अशाही काही गोष्टींमध्ये भरपूर रस होता. त्यामुळं त्यांनी अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यांचीही स्थापना केली. त्यामध्ये साराभाई केमिकल्स, साराभाई ग्लास, औषधांची निर्मिती करणारे कारखाने अशा काही उद्योगधंद्यांचाही समावेश करता येईल. त्या काळात ज्या व्यवस्थापनशास्त्राचा एवढा बोलबाला नव्हता ते व्यवस्थापनशास्त्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी त्यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेची स्थापना केली.

‘कॉस्मिक रेज’ या विषयावर केलेल्या संशोधनामुळं डॉ. विक्रम साराभाई यांचं खूप मोठं नाव झालं. केरळमधल्या थुंबा या ठिकाणी असणाऱ्या क्षेपणास्त्र, उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या स्थापनेमध्ये डॉ. विक्रम साराभाई यांचा महत्त्वाचा वाटा होता. रॉकेटचं म्हणजेचं अग्निबाणांचं उड्डाण त्याचबरोबर अणुऊर्जा निर्मिती याही क्षेत्रात आणि त्या काळात अत्यंत प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या कार्यक्रम प्रक्षेपणाच्या क्षेत्रातही डॉ. विक्रम साराभाई यांनी उत्तम दर्जाची कामगिरी करून दाखवलेली आहे.

Vikram sarabhai information in marathi

आपल्या आवडीच्या विषयाच्या अभ्यासासाठी डॉ. साराभाई यांनी ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ सारखी मान्यवर संस्था स्थापन केली. त्यात अंतरिक्ष विषयक संशोधन हेच प्रमुख स्वरूपाचं काम होईल याची काळजी घेतली. अवकाशात सोडलेल्या उपग्रहामार्फत दळणवळणाच्या सोयी व्हाव्यात, त्या कशा करता येतील या विषयीही डॉ. साराभाई यांनी संशोधन करून, त्यांनी पुण्याजवळचं आर्वी हे उपग्रह केंद्र सुरू करण्यात पुढाकार घेतला होता. त्यांचा अनेक संस्थांशी संबंध होता.

डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या विद्वान संशोधक, शास्त्रज्ञ – वैज्ञानिकानं अंतरिक्ष संशोधनाचा पाया घातला असं म्हणताना इतर शास्त्रज्ञांचा उपमर्द होण्याचं कारण नाही. त्यांना अल्पवयीन मृत्यू आला. पण त्यांच्या नंतरच्या अनेक संशोधकांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन या संशोधन कार्याची धुरा पुढं नेण्यात महत्वाची कामगिरी पार पाडली. अंतरिक्ष संशोधन कार्यासाठी या देशात १९६२ मध्ये डॉ. होमी भाभा यांच्या पुढाकारानं अणुशक्ती खात्यातच एक विभाग सुरू करण्यात आला होता. त्यासाठी १९६९ मध्ये एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचं नाव होतं ‘नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ ‘अंतरिक्ष संशोधनविषयक समिती.’ त्या नंतर ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ ‘भारतीय अंतरिक्षविषयक संशोधन संघटना’ अशी संघटना स्थापन करण्यात आली.

या संघटनेनं अंतरिक्ष विज्ञान, अंतरिक्ष तंत्रज्ञान आणि अंतरिक्ष संशोधनासाठीचं तंत्र-मंत्र, ज्ञान आणि त्या ज्ञानाचा व्यवहार्य वापर याविषयी विचार करणं अभिप्रेत होतं. त्यानंतर १९७२ मध्ये भारत सरकारनं अंतरिक्ष संशोधन विषयक विचार करण्यासाठी एका मंडळाची स्थापना केली. त्याचबरोबर त्यासाठी एक वेगळं खातं निर्माण करण्याचाही निर्णय घेतला. ‘स्पेस कमिशन’, ‘डिपार्टमेंट ऑफ स्पेस’ आणि ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ या तिन्ही संस्थांची प्रमुख कार्यालयंही बंगळूरमध्येच आहेत. आपणा सर्वसामान्यांना जे ‘इस्रो’ नावाचं संघटन ठाऊक आहे ते ‘डिपार्टमेंट ऑफ स्पेस’ या खात्याच्या अखत्यारीत काम करतं. उपग्रहांचा वापर करून शिक्षण, दळणवळण, शेती, पाणी पुरवठा इत्यादींसाठी सतत संशोधन करून देशाच्या एकंदर प्रगतीच्या प्रक्रियेत विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा वाटा उचलणं हे काम प्रामुख्यानं करणं हेच इस्रो ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशन’ सारख्या संस्थेचं काम आहे.

याशिवाय उपग्रहांचा वापर करून विविध प्रकारची पाहणी करणं तसंच हवामानविषयक अंदाज व्यक्त करण्यात मदत करणं, शिवाय देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर नजर ठेऊन, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या कमी-जास्त होण्याविषयी केंद्र सरकारला माहिती पुरवीत राहणं हेही याच ‘इस्त्रो’ संस्थेचं काम आहे. अंतरिक्ष यान किंवा क्षेपणास्त्र सोडण्यासाठी लागणारे उपग्रह तयार करणं किंवा आवश्यकतेनुसार दूरध्वनी, दूरचित्रवाणी, हवामान, शेती, पर्यावरण यांच्यासाठी लागणारे उपग्रह तयार करून ते अंतरिक्षात सोडण्यासाठी लागणारी तांत्रिक मदत तयार करणं हेही या संस्थेनं करायचं आहे किंवा इतर संबंधित संस्थांच्या मदतीनं करून घ्यायचं आहे.


‘इस्त्रो’ या संस्थेची चार प्रमुख केंद्रं या देशाच्या निरनिराळ्या विभागात केवळ त्यासाठीच उभी करण्यात आलेली असून, त्या केंद्रांच्या मार्फत यातली बरीचशी कामं केली जातात.

  1. त्यातलं एक केंद्र आहे ते केरळमधल्या त्रिवेंद्रम या ठिकाणी. त्याचं नाव आहे ‘विक्रम साराभाई अंतरिक्ष संशोधन केंद्र’ (व्ही.एस.एस.सी.).
  2. दुसरं आहे ते कर्नाटका मधल्या बंगळूर या राजधानीच्या शहरात. त्याचं नाव आहे ‘इस्त्रो सॅटेलाईट सेंटर’ (आयसॅक).
  3. तिसरं आहे ते आंध्रप्रदेशमधल्या श्रीहरीकोट्टा या ठिकाणी. त्याचं नाव आहे- ‘शार सेंटर.
  4. आणि चौथं आहे गुजरातमधल्या अहमदाबाद या शहरामधल्या मध्यवर्ती भागात. त्याचं नाव आहे ‘स्पेस अप्लिकेशन सेंटर’ (सॅक).

यापैकी त्रिवेंद्रममधल्या विक्रम साराभाई सेंटरकडे अग्निबाण आणि ते सोडण्यासाठी लागणारी वाहनं तयार करण्याचं काम आहे. मेनका, रोहिणीसारखे अग्निबाण तयार करण्याचे कार्यक्रम याच केंद्रात राबवले गेले. त्याचप्रमाणं ‘एस्.एल्.व्ही. ३’ सारखी अग्निबाण वाहून नेणारी वाहनंही याच केंद्रात बनवली गेली आहेत. त्रिवेंद्रममधलं विक्रम साराभाई सेंटर हे सर्वात महत्वाचं अंतरिक्ष संशोधनविषयक संशोधन केंद्र आहे. थुंबा प्रक्षेपण केंद्रही याच केंद्राच्या अखत्यारीत काम करतं. कर्नाटकमधलं बंगळूर या ठिकाणी असणारं इस्त्रो हे केंद्र ‘आर्यभट’ यासारखा उपग्रह बनवण्याचं काम करतं. त्यानंतर ‘भास्कर’ सारखा उपग्रहही याच केंद्रात बनवला गेला होता. ‘अॅपल’ ‘रोहिणी’ अशा सारखे उपग्रह याच केंद्रात बनवले गेले आहेत हे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं.

Vikram sarabhai information in marathi

आंध्र प्रदेशातल्या केंद्राचा वापर हा प्रामुख्यानं आकारानं मोठ्या असणाऱ्या उपग्रहांना अवकाशात सोडण्यासाठी केला जातो. या ठिकाणी मोठे उपग्रह जमिनीवरून आकाशात सोडण्यापूर्वी त्यांच्या जमिनीवर कराव्या लागणाऱ्या सर्व पूर्व चाचण्यांची व्यवस्था या केंद्रात करून देण्यात आलेली आहे.अहमदाबादमधलं इस्त्रो हे केंद्र विशिष्ट प्रकारची व्यवस्था करून या कामांना मदत करतं.

आज जर डॉ. विक्रम साराभाई यांनी हे केंद्र आणि त्या केंद्राची कामगिरी बघितली असती तर त्यांना वाटणारं समाधान हे शब्दात व्यक्त करणं खरोखरीच अवघड झालं असतं. आपण घातलेल्या पायावर उभी राहिलेली अंतरिक्ष समन्वयक म्हणून काम करणारी भव्य इमारत बघून त्यांना खरोखरीच आश्चर्य वाटल्याखेरीज राहिलं नसतं. या अहमदाबादच्या केंद्रातच त्या काळात म्हणजे १९७५-७६ या वर्षात उपग्रहाच्या मार्फत प्रक्षेपण करून प्रेक्षक कसकशी प्रतिक्रिया देतात याविषयी अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहण्यात आले होते.

‘सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट’ (साईट) या नावानं त्या काळातला हा प्रयोग खूपच गाजलेला होता. याच अंतरिक्ष संशोधन कार्याचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे इन्सॅट उपग्रहांची मालिका. त्यातून या देशा-मधल्या अनेकविध विकासकामांना चालना मिळाली हे आपल्याला कधीही विसरता येणार नाही. त्यामुळं या क्षेत्रात पायाभूत काम करणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या कामाचं महत्त्व आपल्या अगदी सहज लक्षात येतं. ३० डिसेंबर १९७१ रोजी या वैज्ञानिकाला मृत्यू आला.


अशीच व्यक्ती विशेष माहिती वाचा


येथून शेअर करा

Leave a Comment