kalpana chawla information in marathi: डॉ. कल्पना चावलाकाही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या एका अंतरिक्ष उड्डाणात दुर्दैवानं निधन पावलेली भारतीय महिला डॉ। कल्पना चावला ही वैज्ञानिक कशी काय, असा प्रश्न एखाद्याला पडण्याची शक्यता आहे. पण डॉ. कल्पना चावला हिचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिकांच्या यादीतच घालावं लागणार आहे. कारण कल्पनानं अंतरिक्ष उड्डाणाच्या संदर्भात खूप महत्वाची भर घातलेली आहे हे कधीही विसरता येणं शक्य नाही.
डॉ. कल्पना चावला | kalpana chawla information in marathi
मुळात महिला वैज्ञानिकांची संख्या ही पुरुष वैज्ञानिकांच्या तुलनेत कमी आहे हे तर खरंच, पण तरीही ज्या मोजक्या भारतीय महिला वैज्ञानिक आहेत त्यात डॉ. कल्पना चावला या अंतरिक्षयात्री म्हणून काम केलेल्या वैज्ञानिकेचं नाव कायम स्मरणात राहील. कल्पना ही महिला वैज्ञानिक त्या दृष्टीनं भाग्यवान होती. आपण केलेल्या संशोधनाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची संधी प्राप्त झाली, ती आपल्या वैज्ञानिकांपैकी केवळ एकाच महिला वैज्ञानिकेला. दुर्दैवानं याच अंतरिक्ष संशोधन मोहिमेत कल्पना हिचा दुःखद अंत झाला हाही दैवाचाच भाग. पण ही एकमेव अशी अंतराळ संशोधक महिला होती जिचं भाग्य फार मोठं होतं आणि तितकंच ते दुर्दैवीही होतं असंच म्हणावं लागेल.
कल्पना ही पंजाब राज्यातल्या कर्नाल या गावची. १ जुलै १९६१ रोजी कल्पनाचा जन्म झाला. त्या गावातलं आपलं घर चावला कुटुंबियांनी विजय सेटियाला यांना विकून टाकलं आणि चावला कुटुंबीय त्यानंतर राजधानी दिल्लीला आले. त्यामुळं चावला ही जरी पंजाबी असली तरी ती वाढली, मोठी झाली ती दिल्लीच्याच वातावरणात. चावलांचं ते कर्नालमधलं घर मात्र त्या सेटियाला मंडळींनी अगदी चकाचक करून टाकलेलं आहे.
मुळातलं मातीचं असणारं हे घर. पण आता त्या घराचं बंगल्यात रूपांतर झालेलं आहे. मात्र मोठ्या अभिमानानं कर्नालमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना हे सेटियाला मंडळी घर दाखवतात आणि कल्पना चावलाचा जन्म याच घरात झाला होता हेही सांगत असतात. अर्थात बरोबरच आहे म्हणा. त्यांना अभिमान वाटावा अशीच ती घटना आहे. कारण केवळ सेटियाला यांनाच नव्हे, तर साऱ्या कर्नालवासीयांनाच आता कल्पना चावला ही एखाद्या चमचमत्या ताऱ्यासारखी वाटते.
कारण कल्पना चावला या अंतरिक्ष यात्रीनं या गावाचं नाव खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अजरामर करून ठेवलं.एक गोष्ट खरी, की कल्पना चावला हिचा कर्नाला ते हयूस्टन हा प्रवास फार अवघड होता असं तिचे कुटुंबीय आणि मित्र परिवारातील मंडळीही सांगतात. ‘आपण एक महिला असलो तरी आपण अंतरिक्ष यात्री होऊ शकतो आणि अंतराळ मोहिमेची कामगिरी करून दाखवू शकतो हे जगाला पटवून देणं’ ही कल्पना समोर मोठी आव्हानात्मक अशी बाब होती. कल्पनाला तिचे जवळचे नातेवाईक ‘मोंटू’ या टोपण नावानं संबोधीत असत. ही ‘मोंटू’ अगदी लहानपणापासूनच ग्रह, नक्षत्र, तारे, चंद्र, सूर्य, अंतराळ, अंतरिक्ष याबाबत कमालीची उत्सुकता दाखवीत असे असंही तिचे सगेसोयरे सांगताना आढळतात.
कल्पनाला दोन बहिणी आणि एक भाऊ. कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला. ते मुळात पाकिस्तानमधल्या पश्चिम पंजाब प्रांतातल्या शिखपोरा या गावचे. १९४७ च्या फाळणीनंतर ते भारतात आले. अखेरीस कर्नालमध्ये स्थायिक होईतोपर्यंत चावला कुटुंबियांनी अनेक प्रकारचे व्यवसाय करून बघितले.कर्नाल हे ठिकाण दिल्लीपासून साधारण सव्वाशे किलोमीटर दूर आहे. त्या ठिकाणी त्यानी टायर्स आणि रबरी पट्टे बनवण्याचा व्यवसाय उभा केला. कल्पनाच्या डोक्यात पहिल्यापासूनच नेहमीच्या परंपरागत वाटेनं न जाता काही तरी जगावेगळं करून दाखवण्याचा मानस होता. ती क्रमिक शिक्षणात पुढे होतीच, पण तिनं अगदी तरुण वयातच उड्डाणाच्या विविध पैलूंची माहिती करून घ्यायला सुरवात केली होती.
१९७६ साली कल्पना ‘टागोर बाल निकेतन’ या विद्यालयातून शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली. अगदी त्या वेळेपासूनच तिच्या डोक्यात अंतरिक्ष उड्डाणाच्याच क्षेत्रात करियर करावं असं आलं होतं.ती त्या वेळेपासूनच यानं कशी बनतात, ती अंतरिक्षात कशी उडवली जातात, अंतरिक्ष यानाची रचना कशी असते, यान अवकाशात जाताना नेमकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया घडते, याविषयीची माहिती गोळा करीत होती.ती वर्गात पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये असायची. आठव्या इयत्तेत असतानाच तिनं ग्लायडरमधून ग्लायडींग केलं होतं. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतात, ना तोच प्रकार कल्पना चावलाच्या बाबतीत खरा होता. आपल्या वडिलांच्या मागं लागून कल्पना आणि तिच्या भावानं ‘पुष्पक’ विमानाचा प्रवास करून बघितला होता.
असा प्रवास अनेक जण करतात. पण त्यातून अंतरिक्षविषयक शास्त्रीय, वैज्ञानिक दृष्टिकोन किती जण मिळवू शकतात हाही प्रश्न आहेच. यातूनच कल्पनाला ‘एरोस्पेस इंजिनियरिंग’ या अत्यंत अवघड पण वैज्ञानिकदृष्ट्या तितक्याच महत्वाच्या अशा विषयाची गोडी उत्पन्न होऊ लागली. कल्पना म्हणायची की उद्योगपती जे. आर. डी. टाटा आणि त्यांचं विमानउड्डाणामधलं कौशल्य याच माझ्या प्रेरणा असाव्यात.अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये तिला विमानोड्डाणाचं प्रमाणपत्र प्राप्त झालं. तिचे अमेरिकन पती जीन पेरी हॅरिसन हे विमानोड्डाणाचे प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पनानं विमानोड्डाणाचे अनेक प्रयोग करून बघितले. तिनं पंजाब इंजिनियरिंग कॉलेजातून विमानोड्डाण तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळीही तिला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं.
‘एरोस्पेस इंजिनियरिंग’ हा विषय घेऊन पदवी मिळवणारी ती त्या कॉलेजमधली एकमेव मुलगी होती. त्या कॉलेजात ७ मुली होत्या. पण हा अवघड विषय घेऊन पदवी संपादन करणारी कल्पना ही एकटीच होती. ‘एरोस्पेस इंजिनियरिंग’ या शाखेऐवजी तिनं मेकॅनिकल वा इलेक्ट्रॉनिक्स अशा शाखांकडं जावं म्हणून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण कल्पनानं हाच विषय घेऊन पदवी प्राप्त करण्याचा हट्ट केला आणि शेवटी ती त्यात यशस्वीही झाली.अंतरिक्ष संशोधन या विषयासंबंधी परिसंवाद, चर्चा आयोजित करताना कल्पना चावला हिचा उत्साह ओसंडूनच वहात असे असं तिचे प्राचार्य डॉ. शर्मा यांनी नमूद केलेलं आहे. तिच्या या साऱ्या कामगिरीमुळंच तिला अमेरिके- मधल्या विद्यापीठात ‘एरोस्पेस इंजिनियरींग’ या विषयात अधिक उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवणं सोपं झालं.
अमेरिकेतल्या ‘टेक्सस अरलिंग्टन’ या विद्यापीठात प्रवेश मिळवल्यानंतर परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी चावला कुटुंबियांची परवानगी मिळवता मिळवता कल्पनाच्या नाकी नऊ आले होते. पण शेवटी तिनं ते जमवलं. पण हे सारं करताना तिला कोर्समध्ये दाखल व्हायला मात्र उशीर झाला. १९८४ मध्ये शेवटी तिनं टेक्सस विद्यापीठातून ‘एरोस्पेस इंजिनियरिंग’ या विषयात एम. एस्सी. ही पदवी मिळवली.
मग तिनं १९८८ मध्ये याच विषयात पीएच.डी. पदवी विद्यापीठातून मिळवली आणि १९८८ मध्ये तिन अमेरिकेच्या ‘नासा’ म्हणजेच ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन च्या’ संशोधन विभागात काम करायला प्रारंभ केला.यात संशोधन हाच तिच्या कामाचा गाभा राहिला. त्यातही अंतरिक्ष यानात होणाऱ्या संगणकाच्या वापराच्या संबंधानं तिनं निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग करून बघितले आणि मग १९९३ मध्ये ‘ओव्हर सेट मेथडस् इन् कॅलिफोर्निया’ या कंपनीत ती अधिक मोठ्या पदावर म्हणजेच त्या कंपनीची ‘व्हाईस प्रेसिडेंट’ या पदावर रुजू झाली.
‘एरोडायनॅमिक्स’ याविषयात अधिकाधिक सुधारणा करून अंतराळातल्या यानाची कार्यक्षमता, वेग, अचूकता या विषयी तिच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी कल्पनानं खूप व्यवस्थित रितीनं पार पाडली. त्यानंतरचा तिच्या आयुष्यामधला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९९४ डिसेंबर महिन्यात तिची अंतरिक्षयात्री म्हणून निवड करण्यात आली. आणि मग ती मार्च १९९५ मध्ये जॉन्सन स्पेस सेंटर या ठिकाणी पुढच्या प्रशिक्षणासाठी रुजू झाली. साधारण वर्षाच्या प्रशिक्षण काळानंतर तिची अंतरिक्षयानात जाणाऱ्या टीममध्ये अंतरिक्षयात्री म्हणून निवड करण्यात आली.
‘एस्.टी.एस.७८’ या अंतरिक्षयान मोहिमेतली एक महत्त्वाची अंतरिक्षयात्री म्हणून तिच्यावर अनेक तांत्रिक जबाबदाऱ्या सुपूर्द करण्यात आल्या. वजनरहित अवस्थेत शरीराच्या होणाऱ्या अंतरिक्षयानातल्या अवस्थेतल्या हालचालींविषयी अधिक संशोधन करण्याची जबाबदारीही तिच्यावर सोपवण्यात आली. त्याचबरोबर सूर्याच्या भोवतीचं वातावरण याविषयीची निरीक्षणं नोंदवणं हीही कामगिरी तिच्याकडे देण्यात आली होती.
कल्पनाच्या कामाबद्दल थोडीशी कुरबुर कानावर येत होती. कारण उपग्रहात काही अडचणी निर्माण झाल्याचं लक्षात येत होतं.या तिच्या अंतरिक्ष प्रवासाच्या वेळी ज्या काही तांत्रिक बाबी नीट बघून घ्यायला हव्या होत्या, त्या नीट बघितल्या गेलेल्या नाहीत अशाही प्रकारच्या काही कुरबुरी कानावर येत होत्या. पण कल्पनाच्या बाबतीत तशी काही अडचण नव्हती. कारण ५ वर्षांच्या काळात ‘नासा’नं कल्पनाला एकदाच नव्हे तर दोनदा अंतरिक्ष उड्डाणात सहभागी होण्यासाठी परवानगी दिली होती. एस्. टी. एस्. १०७ या उड्डाणाच्या वेळी यानामधल्या सर्व सेवा व्यवस्थित रितीनं कार्यरत आहेत हे पाहण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती. त्याबाबत तिनं दक्षतापूर्वक सर्व चाचण्या घेतल्या होत्या.
मुख्य वैमानिक म्हणजेच अंतराळयात्री आणि त्याचा सहप्रवासी यांच्या कानावर या अडचणी घालण्याचं कामही कल्पनावर सोपवलेलं होतं. ते ती पूर्ण जबाबदारीनं पारही पाडत होती. कल्पनाचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. तिच्या त्या अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रम प्रसंगी तिच्याच पुढाकारानं पंजाबमधल्या किमान दोन विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘नासा‘ केंद्र पहायला मिळावं अशी व्यवस्था ती करीत असे. त्यामुळं कल्पना ही साऱ्यांची कल्पनादीदी म्हणूनच ओळखली जायची. ‘नुसती स्वप्नं बघू नका, तर ती प्रत्यक्षातही आणण्याचा प्रयन करा’ हेच तिचं सांगणं होतं.
आपण म्हणतो, ‘पहिली मुलगी धनाची पेटी.’ खरोखरीच कल्पनासारखी गुणी- अंतरिक्षयात्री वैज्ञानिक आपल्याही पोटी जन्माला यावी असं कुणाला वाटणार नाही ? मग ते मातापिता पंजाबी असोत की मराठी !! नाही का ?अंतरिक्षयात्री कल्पना चावला ही शहरातल्याच नव्हे, तर ग्रामीण क्षेत्रातल्या तरुण विद्यार्थिनींची एक ‘रोल मॉडेल’ आहे, आदर्श आहे. कल्पना चावला हिला अंतरिक्षयात्रा संपवून परतताना आलेला मृत्यु हा तर दुर्दैवीच आहे.
पण या संशोधिकेनं तरुण-तरुणींच्या मनात अंतरिक्ष संशोधनाबद्दलचं विलक्षण आकर्षण निर्माण केलं आहे. ज्याप्रमाणं किरण बेदी, मीरा बोरवणकर अशा महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक तरुणींना पोलिसात भरती होण्यासाठी प्रोत्साहित केलं त्याचप्रमाणं कल्पना चावला हिनंही असंख्य भारतीय तरुण वैज्ञानिकांना अंतरिक्ष संशोधनासाठी प्रेरणा देण्याचं महत्त्वाचं काम केलेलं आहे. कल्पना चावलासारख्या महिला या आधुनिक काळातल्या उर्जा-स्रोत असतात. विकास कार्यातल्या त्या दीपस्तंभ असतात.१९ एप्रिल १९७१ रोजी पहिलं अंतराळयान अवकाशात सोडलं गेलं. त्यानंतरच्या ३०-३५ वर्षांच्या काळात या क्षेत्रानं अप्रतिम प्रगती करून दाखवली आणि नव्यानं निर्माण झालेल्या या वैज्ञानिक – क्षेत्रात कल्पना चावला हिच्यासारख्या भारतीय वैज्ञानिक महिलेनं डोळे दिपून जावेत असं नेत्रदीपक यश संपादन करून दाखवलं.
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची पताका उंचावणारी कल्पना चावला ही एक मान्यवर महिला वैज्ञानिक ठरली आहे हे निर्विवाद. आज महिला अनेक वर्षं प्राध्यापिका म्हणून काम करताहेत. पोलीस खात्यात आहेत. सनदी नोकरीमध्ये आहेत. न्यायदानाच्या कामात आहेत. लष्करातसुद्धा आहेत. राजकारणातही खूपच आघाडीवर आहेत. ‘केवळ चूल-मूल’ ही महिलेची प्रतिमा आता पूर्णपणानं बदलली आहे. कल्पना चावलासारख्या वैज्ञानिक-शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ महिलेची चारित्र गाथा वाचून भारतीय महिला ही अधिकाधिक विस्तारलेल्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करील असा विश्वास वाटतो.’मरणात खरोखर जग जगते’ ही उक्ती कल्पना चावला हिच्या दुर्दैवी मृत्यूनं, सिद्ध होताना दिसते.
कारण वयाच्या केवळ चाळिशीत असतानाच मृत्यु आलेली कल्पना ही खऱ्या अर्थानं अजरामर झालेली आहे. लाखो भारतीयांच्या मनात कल्पना चावला हिच्याबद्दल अपार आदर आहे. तिच्या त्या दुर्दैवी मृत्युबद्दल हळहळ आहे आणि तरीही कल्पना चावलासारखं अंतरिक्षयात्री होण्याचं स्वप्न बघणाऱ्या लाखो तरुणी या देशात त्या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसताहेत. मला असं वाटतं, की कल्पना चावला हिच्यासारख्या महिला – अंतरिक्षयात्रीचं जीवन आणि तो दुर्दैवी, अपघाती मृत्यु या दोन्ही गोष्टी त्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणींना प्रेरणादायी आहेत यात शंका नाही.
असेच नवनवीन भारतीय शास्त्रज्ञांची माहिती वाचा
1 thought on “डॉ. कल्पना चावला मराठी माहिती | kalpana chawla information in marathi”