Dr Vijay Bhatkar Information In Marathi: भारतीय संगणक शास्त्राच्या क्षेत्रात आपली ठसठशीत नाममुद्रा उठवणारा एक आंतरराष्ट्रीय कीर्तिचा वैज्ञानिक म्हणून डॉ. विजय भटकर या संगणक- शास्त्रज्ञाची नोंद केव्हाच होऊन गेली आहे. अमेरिका या जगातल्या सर्वशक्तिमान देशानं भारतासारख्या विकसनशील देशाला अचानकपणानं सुपर संगणक द्यायला नकार दिला आणि त्याच क्षणी डॉ. विजय भटकर या संगणक शास्त्रज्ञाचं नाव या क्षेत्रात अजरामर होऊन गेलं.
आज या घटनेला तशी 40-42 वर्ष झाली. पण राजीव गांधी पंतप्रधान असताना सुपर संगणक बनवण्याचं तंत्रज्ञान अमेरिकेनं अचानकपणानं भारताला द्यायचं नाकारलं आणि डॉ. विजय भटकर या तरुण संगणक शास्त्रज्ञानं पंतप्रधानपदी असणाऱ्या राजीव गांधी यांना ‘आपण भारतीय शास्त्रज्ञही ते तंत्रज्ञान विकसित करू शकतो आणि काळजी करू नका, आम्ही आमच्या ‘सी-डॅक’ या संगणकविषयक तंत्रज्ञा केंद्रातही सुपर संगणक बनवू शकू’ असं सांगितलं. आणि तसा महासंगणक त्यांनी बनवून दाखवला. पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासकट अनेक जणांनी डॉ. भटकर या संगणक शास्त्रज्ञाची पाठ थोपटली. त्या क्षणापासून आजवर संगणकाच्या क्षेत्रात अमेरिकेसारख्या बलाढ्य म्हणवणाऱ्या देशालाही आज अनेक वर्षं भारतातल्याच तरुण संगणक शास्त्रज्ञांच्या मदतीवर अवलंबून राहवं लागत आहे हे विसरता येत नाही.
भारतीय संगणक क्षेत्रातला दादा माणूस | Dr Vijay Bhatkar Information In Marathi
डॉ. विजय भटकर या संगणक वैज्ञानिकाचं या क्षेत्रातलं योगदान या स्वरूपाचं आणि अत्यंत महत्वाचं असं आहे. पुणे विद्यापीठाच्याच आवारात या वैज्ञानिकानं सी-डॅक म्हणजे ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड् काँप्युटिंग’ या नावाची आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेली संस्था विकसित केली. पुणे विद्यापीठात एका टोकाला ही संगणकविषयक संशोधन करणारी संस्था कार्यरत आहे. दुसऱ्या टोकाला डॉ. जयंत नारळीकर यांची ‘आयुका’ ही खगोलशास्त्रविषयीचं संशोधन करणारी संस्था आहे. पुणे विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या या दोन संस्थांमुळंच परदेशी संशोधकांचा, प्राध्यापकांचा, विद्वानांचा राबता या भागात सतत असतो हेही या ठिकाणी नमूद करायला हवं.
पुण्याच्या पाण्याची आणि हवामानाची गोष्टच अशी आहे, की ऐतिहासिक काळापासून ते आजच्या वर्तमान काळापर्यंत इथल्या विविध प्रकारच्या मंडळींना संस्था स्थापन करून त्याचा प्रचंड विकास करीत राहण्याचा एक प्रकारचा ध्यासच आहे. डॉ. विजय भटकर काय, किंवा डॉ. जयंत नारळीकर काय, यांच्यासारखी मंडळी ही अनेकविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासनिक, वैज्ञानिक अशा निरनिराळ्या प्रकारच्या संस्था निर्माण करून आपलं सारं आयुष्य हे त्यांच्या विकासासाठी झोकूनदिले आहे. एक व्यक्ति एक संस्था असा हा उद्योग पुण्यासारख्या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात असल्याचं जाणवतं.
अनेक संशोधकांनी स्वतःच्या अशा संशोधन संस्था निर्माण केलेल्या आहेत. शासनाची मदत मिळो न मिळो, अनेक माणसं ही स्वतःच्या ताकदीवर या संशोधन संस्थांचं काम मोठ्या नेटानं पुढं नेताना दिसताहेत. पुण्यामधील डॉ. विजय भटकर यांच्या पुढाकारानं सुरू झालेली ‘सी-डॅक’ ही संस्था अशाच स्वरूपाची आहे. आज मात्र डॉ. विजय भटकर हे त्या संस्थेत नाहीत. ते आज वेगळ्याच प्रकारचं, पण संगणक क्षेत्राशी संबंधित स्वरूपाचंच काम करीत आहेत. याशिवाय विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून ही दोन्ही क्षेत्रं कशी परस्परावलंबी आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न डॉ. विजय भटकर यांनी अंगिकारलेला आहे.
ज्ञानेश्वरीमधलं तत्वज्ञान आणि संगणक शास्त्र यांची सांगड घालण्याचाही डॉ. विजय भटकर यांचा प्रयत्न सुरू आहे. ‘मूर्ती लहान असली, तरी कीर्ति मात्र महान असणारा हा वैज्ञानिक ‘मायक्रोसॉफ्ट’ या अमेरिकेतल्या संगणक कंपनीचे मालक बिल गेटस् यांच्यासारखा पैशानं श्रीमंत नसेलही कदाचित. पण विद्वत्तेचा विचार केला, तर इंजिनियरिंग-विज्ञानाची पीएच.डी. प्राप्त केलेले डॉ. विजय भटकर हे किती तरी पटीनं सरस आहेत असंच म्हणावं लागेल. अजून तरी डॉ. विजय भटकर यांना ‘भारत भूषण’ किंवा खरं तर ‘भारतरत्न’, अशा गौरवानं अधिकृतपणानं गौरवण्यात आलेलं नसलं तरी, देशामधल्या अनेक मान्यवर वैज्ञानिकांपैकी एक असा लौकिक त्यांना केव्हाच प्राप्त झालेला आहे.
‘परम’ सुपर संगणक बनवणारा आणि बहुभाषिक भाषांतर एकाच वेळी संगणाकाद्वारे करू शकणारं नवं तंत्र शोधून काढणारा वैज्ञानिक हीच डॉ. विजय भटकर यांची खरी ओळख असणार आहे. डॉ. भटकर सध्या एका नव्या योजनेच्या संदर्भात कार्यरत असून ‘ई.टी.एच्’ म्हणजेच ‘एज्युकेशन टू होम’ घरबसल्या शिक्षण ही योजना तयार करून ती घरोघरी पोहोचवण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक संशोधन आणि विकासविषयक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन करून त्यांचा विस्तार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे.
‘सी-डॅक’ म्हणजेच ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉप्युटिंग’ ही या अशा संस्थांपैकी एक महत्वाची संस्था आहे. इलेक्ट्रॉनिक संशोधन, संशोधन आणि विकास, ईटीएच् संशोधन प्रयोगशाळा अशा किती तरी संस्था डॉ. विजय भटकर यांच्या अथक परिश्रमानं नावारूपाला आलेल्या दिसतात. भारतात आय्. टी. म्हणजेच ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ आणि इंडिया मल्टीयुनिव्हर्सिटी इंटरनॅशनल अशाही क्षेत्रात त्यांनी भरघोस काम करून दाखवलेलं आहे. सर्वांगीण शिक्षण विषयक कल्पना राबवण्याचा त्यांचा त्यामागं उद्देश आहे. आणि तो ते मोठ्या नेटानं राबवताना आजही दिसताहेत.
डॉ. विजय भटकर यांच्या संगणक विज्ञान शिक्षण प्रसार या क्षेत्रातल्या महत्वाच्या कामगिरीचा गौरव म्हणून 2000 साली भारत सरकारनं त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला, तर 1999-2000 चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा गौरव महाराष्ट्र शासनानं त्यांना बहाल केला आहे. याशिवाय डॉ. विजय भटकर यांना अनेकविध प्रकारचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त झालेले आहेत. संगणक तंत्रज्ञान संशोधन आणि विकास या क्षेत्रात जेवढी मान्यता डॉ. विजय भटकर यांना आहे तेवढी मान्यता अन्य कुणा शास्त्रज्ञ- वैज्ञानिकाला नाही हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करायला हवं.
लोकमान्य टिळक गौरव पुरस्कार हा अतिशय सन्मानाचा मानला गेलेला पुरस्कारही डॉ. विजय भटकर यांना 1999 मध्ये देण्यात आलेला आहे. प्रियदर्शनी हाही सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. खरं म्हणजे डॉ. विजय भटकर यांना मिळालेल्या पुरस्कार आणि सन्मान-गौरवांची यादीच एवढी मोठी आहे. डॉ. विजय भटकर हे जनसामान्यांपर्यंत संगणक शास्त्र पोहोचवणारे असे वैज्ञानिक आहेत. छोटेसे दिसणारे डॉ. भटकर एकदा बोलायला लागले, की या वैज्ञानिकाच्या ज्ञानाची सहजी कल्पना येते. अनेक पुरस्कार मिळवणारे असा जसा त्यांचा गौरवानं उल्लेख करता येईल त्याचप्रमाणं अनेकविध समित्यांवर काम करणारे आणि अनेक समित्यांवर सल्लागार म्हणून कार्यरत असणारे असाही डॉ. विजय भटकर यांचा गौरव करता येईल.
केंद्र सरकारच्या कॅबिनेट कमिटीच्या वैज्ञानिक समितीचे एक सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पंतप्रधानांनी माहिती तंत्रज्ञान विकासविषयक कार्यक्रम राबविण्यात जे अनेक गट स्थापन केले त्यातही डॉ. विजय भटकर यांचा समावेश होता. रॉयल सोसायटी या नावानं परिचित असणाऱ्या इंग्लंडमधल्या वैज्ञानिकांच्या सभेतच संगणकशास्त्र या विषयावर खास बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. भारतानं दक्षिण आफ्रिकेला माहिती तंत्रज्ञान आणि संगणक क्षेत्रात कशी मदत करावी याविषयी विचार करणाऱ्या समितीचे ते नेते होते.
या शिवाय भारत-फ्रेंच आणि भारत-हंगेरी संयुक्त समित्यांचेही ते सदस्य होते. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रात संगणकाचं काम करणाऱ्या अनेक वैज्ञानिकांमध्ये डॉ. विजय भटकर यांचे कितीतरी शिष्य आहेत. या देशातल्या मंडळींना शिक्षण घरपोच देण्याच्या कल्पनेनं निघालेल्या ईटीएच् या संस्थेचे अध्यक्ष म्हणून सध्या डॉ. विजय भटकर हे कार्यरत होते. डिश नेट याही संस्थेत ते अध्यक्ष होते. 1998 मध्ये अमेरिकेनं भारताला परम संगणकासारखं तंत्रज्ञान द्यायला नकार देताच डॉ. भटकर यांनी 1998 मध्ये ‘परम-8000’ आणि 1999 मध्ये ‘परम-10,000’ असे संगणक विकसित करून अमेरिकेचं आव्हान स्वीकारलं त्या क्षणापासून त्यांची या क्षेत्रातला एक दादा माणूस म्हणून ओळख पटायला लागली.
या देशातल्या 140 कोटी लोकांपैकी 15-20 टक्केच लोक इंग्रजी बोलतात. बाकीचे सारे भारतीय भाषांमधून व्यवहार करणारे आहेत हे लक्षात घेऊन संगणकामध्येच विविध भाषांचं भाषांतर करण्याचं तंत्र विकसित करण्यात सी- डॅक या संस्थेनं जे यश मिळवलं त्यात डॉ. भटकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे इंग्रजीबरोबर इतर भाषांमधलं भाषांतरित साहित्य वा संभाषण वाचण्याची वा ऐकण्याची सोय या तंत्रामुळे शक्य झालेली आहे. संगणक तंत्रज्ञांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्यासाठी संगणक प्रशिक्षणाच्या अनेक सोयी सी-डॅक या व अन्य संस्थेतही निर्माण केलेल्या आहेत. त्यांची स्वतःची 8 पुस्तकं प्रकाशित आहेत. माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण प्रसार हेच त्यांच्या जीवनाचं आज मोठं मिशन बनलेलं होत.
एक अत्यंत मान्यवर असा हा वैज्ञानिक महाराष्ट्रातल्या विदर्भामधल्या मुरंबा या छोटेखानी गावात 11 ऑक्टोबर 1946 रोजी जन्माला आला. 1972 मध्ये त्यांनी दिल्लीमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पीएच्.डी. ही पदवी प्राप्त केली. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून मुळात इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केलेले डॉ. विजय भटकर हे 77 वर्षांचे आहेत. त्यांच्यापुढं अजून उज्ज्वल असा भविष्यकाळ आहे. या पुढच्या काळात डॉ. विजय भटकर त्यांचे अनेक नवीन प्रकल्पही राबवू शकतात. त्यात विविध भारतीय नद्यांचं पाणी स्वच्छ करणं, संगणक शास्त्राचा वापर करून वेदकालातील ज्ञानाचं संगोपन, संवर्धन करणं आणि संगणकशास्त्राचा जास्तीत जास्त प्रसार करणं ही डॉ. विजय भटकर यांनी अंगिकारलेली कामं त्यांना अधिकाधिक यशस्वी बनवतील यात शंका नाही.
विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याचा हा आणखी एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न आहे. डॉ. विजय भटकर आणि ज्ञानेश्वरी चे एक भाष्यकार किसन महाराज साखरे यांची एकत्र बोलणी ऐकली, की अतिशयोक्तीचा दोष पत्करूनही, विख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाईन आणि ज्ञानेश्वरी चे निर्माते ज्ञानेश्वर महाराज यांची गाठ पडली असती तर त्यांनी विज्ञान आणि अध्यात्माची कशी सांगड घातली असती याची प्रचिती येऊ शकते. अतिशय वेगानं बोलणारा असा हा वैज्ञानिक आहे. कारण त्याची कल्पना शक्ती हीच मोठी वेगवान असली पाहिजे. अत्यंत ग्रामीण भागात शिकलेला हा वैज्ञानिक पण आता मराठी या आपल्या मातृभाषेत बोलताना अवघडत बोलताना दिसतो. तरीही त्यांना मराठी भाषेत संवाद साधताना अडचणीचं का वाटावं ते कळत नाही.
इंग्रजी भाषेवर मात्र त्यांचं प्रभुत्व आहे. पण आपल्या मातृभाषेतून बोलताना त्यांना अनेकदा अडखळल्यासारखं होतं. खूप दारिद्रय बघितलेला आणि मुळात मराठी या आपल्या मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेला असा हा वैज्ञानिक आहे.अनेक पुरस्कार, पारितोषिकं, शिष्यवृत्त्या मिळवलेल्या या वैज्ञानिकाच्या नावावर 8 ग्रंथ लिहिल्याची नोंद आहे. तसंच त्यांचे 80 च्या वर शोध-निबंध विविध परिषदांमध्ये विद्वानांच्या समोर सादर झालेले आहेत. माझ्यासारख्या अनेकांना विजय भटकर हे ऊर्जा स्त्रोत वाटतात. अतिशय विधायक दृष्टिकोनातून विचार करणारा असा हा शास्त्रज्ञ आहे.
अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणं हेच या वैज्ञानिकाचं अंतिम ध्येय असावं असं त्यांनी अंगिकारलेल्या कामावरून दिसतं. ज्ञानोबारायांची आळंदी आणि किसनमहाराज साखरे यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अभ्यास ही डॉ. विजय भटकर यांची दोन प्रेरणा आणि श्रद्धा स्थानं आहेत. संगणक माहिती तंत्रज्ञान आणि अध्यात्म हेच या माणसाचं दैनंदिन जीवन आहे. तोच त्यांचा श्वास आणि ध्यास आहे.
अशीच नवीन अवलियान बद्दलची माहिती वाचा